My Blog List

Sunday, July 27, 2014

नवे संगीत नाटक- झाला महार पंढरीनाथ


महाराष्ट्रातील भाविक रसिकांना निश्चित आवडेल असे एक संगीत नाटक नुकतेच बालगंधर्व रंगमंदिरात सादर झाले. संगीत व अभिनय या दोन्हीबरोबर दिग्दर्शकाची चांगली कामगिरी यामुळे सुशिल थिएटर्सचे झाला महार पंढरीनाथ हे नाटक समाधान देणारे आहे.
मंगळवेढ्याचे ठाणेदार दामाजीपंत यांच्या सत्यशील व धार्मिक वृत्तीला साक्षात पांडुरंगाने दिलेली हाक हे या नाटकाचे मूळ आहे. भक्तासाठी परमेश्र्वराने धावून येणे व भक्ताला संकटातून सोडविणे हा या नाटकातील मूख्य कथाभाग आहे.
पांडुरंग घांग्रेकर या लेखकाने लिहलेले हे नाटक संवादातून व प्रसंगातून उत्तम खुलते. त्यांचे हे नाटक जितके संवादाने उठावदार होते तितके पदांनी होत नाही. पदांची रचना भक्तिरसाला पूरक असली तरी वरवरची आहे. मात्र लेखकाचे पहिले व्यावसायिक नाटक अपेक्षा निर्माण करते.
केशवराव मोरे या दिग्दर्शकाने संगीत नाटकाची मांडणी प्रसंगानूरुप चांगली सजविली आहे. नावाच्या कलाकारांबरोबरच काही नव्या मंडळींना घेऊन तयार केलेला हा एक वैशिष्ठ्य़पूर्ण प्रयत्न आहे. दामाजीपंतांना पकडणे, राधेला वेड लागणे, बादशहाच्या दरबारात विठू महार येणे वगैरे प्रसंग मोरे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची जाणीव करून देतात.
आपल्या रसिल्या आवाजाने दामाजीपंत सादर केला तो प्रकाश घांग्रेकर यांनी. ठाणेदाराचा करारीपणा व परमेश्वरापाशी लीन झालेला दामाजीपंत त्यांनी योग्य ताकदीने उभा केला. येई मना करुणता, नव्हे नव्हे तो महार हाची करुणाकर माझा..ही दोन पदे विशेष रंगली.
नाटकात प्रेक्षकांच्या लक्षात रहाते ती योजना भाट्ये. गोपिकाबाईची भूमिका योग्य ठसक्यात व आवाजाच्या चढ-उताराने त्यांनी ती प्रभावी वठविली. मात्र काही ठिकाणी त्यांचे बोलणे कृत्रीम न होईल याची काळजी घ्यायला हवी. चंद्रकांत कोळी यांचा विठू महार गायला, दिसला व बोललाही तडफेने. आवाजातील गोडवा व स्पष्टपणा य़ामुळे त्यांची पदे विषेश रंगतात. उठा उठी हो भक्तगण, अगाध ही माया प्रभुराया ,या दोन पदांनी मधुवंती दांडेकरांनी सावीत्रीचे रुप व्यवस्थित साकार केले. सुखाबरोबरच दुःखात सहभागी होणारी पत्नी  त्यांनी सहजपणे व आवाजातील गोडव्याने योग्य उभी केली. चंद्रकांत वैद्य( बादशहा),  पंढरीनाथ बेर्डे (मुजुमदार) विषेश लक्षात रहातात ते त्यांच्या रुबाबदार आणि उत्तम संवादफेकीमुळे. अंजली घांग्रेकर राधेच्या भूमिकेत समरस झाल्या होत्या. पण पांडुरंग घांग्रेकरांचा गेन्या नाटकाशी एकरुप न होता हुशारीने संवाद म्हणत होता इतकेच.
विजय जोशी व चंद्रचुड वासुदेव यांचे संगीत नाटकात भक्तिरसाची उणीव पडू देत नाही. संगीताबरोबर नाटकाचे नेपथ्य संगीत नाट्यप्रेमिंना आवडेल. शरद जांभेकरांची ध्वनीमुद्रीत दोन पदेही उठावदार आहेत.
संगीत नाट्य रसिकांनी आवडेल असेच हे नाटक आहे.


-सुभाष इनामदार.
subhashinamdar@gmail.com
9552596276
टिप- गेली काही वर्षे मी लिहलेले कांही मोजके लेख इथे देण्याचा हा पहिला प्रयत्न आहे.हे नाटकपरिक्षण २६ ऑगस्ट १९८० च्या पुण्याच्या दैनिक तरण भारत मध्ये प्रसिध्द झाला होता..ही सारा आठवण पुण्याच्या संस्कृतिक वारशाची ओळख होतं..म्हणून ते पुन्हा टाईप करुन इथे संग्रहित करीत आहे. हा प्रयत्न करावा काय..ते सांगावे..मी आपल्या उत्तराची मेलवर वाट पहात आहे...किंवा फोनवरही..

No comments:

Post a Comment