साल आत्ता नक्की आठवत
नाही..पण १९६८ असावे. मी आई-वडिलांसह माझ्या मामेभावाच्या लग्नाच्या निमित्ताने
पुणे प्रथम पाहिले. तेव्हा मी स्टेशनवरून टांग्यानी बुधवार पेठेतल्या देव वाड्यात
रहात असलेल्या घाटे या मामेबहिणीकडे आल्याचे स्मरते. तेव्हाचे पुणे पानशेत झाल्यानंतर
पुरेपुर सावरले होते..कुठेही ती स्मृती फारशी दिसत नव्हती..नवी पेठेत पुरग्रस्तांसाठी
उभ्या राहिल्या अर्धवर्तुळाकार झोपडीवजा (निसेनबट) घरे असलेली वसाहत होत असावी..
त्यावेळी आत्ता जिथे
सुदर्शन हॉल आहे..तिथे सुदर्शन मंगल कार्यालय होते. तोही आत्ता जे चालवितात.त्या
शुभांगी दामले यांच्या सासूबाई तो सारा व्यवस्थापनाचा कारभार पहायच्या..तिथे विवाह
होता... खरचं ते पुणं अधिक स्वच्छ, सुंदर भासले..या शहरात कधी पुन्हा स्थायिक होऊ
असे वाटण्याचे वयच नव्हते. जेमतेम मी ७ वीत असेन.आपले जग म्हणजे आई-वडील नेतील आणि
दाखवतील ते जग..
पण ते.ती सारसबाग...तो
शनिवारवाडा... विश्रामबागवाडा.. एवढीच पाहिलेली म्हणजे त्यावरून गेल्याने दिसली
तेवढेच पुणे..आणि इकडे स्वारगेट..जिथून सातारला बस जायच्या...
तेव्हा टांगे होते..
वरातीला गॅस बत्ती होत्या...रंगीबेरंगी पोशाखातले बॅंडवाले होते..मात्र रिक्षा
नव्हत्या..आम्हाला त्या टांग्यातून जणू पुणेभर आमचीच सामान घेऊन वरात
निघाल्यासारखी वाटायचे..
हेच आमचे ते पुणे
प्रथम दर्शन...
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276